जेव्हा तुम्ही अपयशी होता, तेव्हा तुमच्याही मनात हे विचार येऊन जातात का?
असं म्हणतात की अपयश ही यशाची पहिली पायरी आहे, मग जेव्हा आपल्या पदरी अपयश येते तेव्हा आपण हे का विसरतो? अपयश येणं म्हणजेच तुम्ही प्रयत्न करत आहात याची पोचपावती असते, मग त्याला का घाबरायचे. यश आणि अपयश या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत.
जसे काही पावलांवर तुम्हाला यश मिळेल तसेच अपयशाला देखिल सामोरे जावे लागेल, आणि त्यासाठी आपल्या मनाची तयारी असणे गरजेचे आहे. अपयशातून आपण खूप काही शिकू शकतो, जे आपल्याला पुढे आयुष्यात उपयोगी पडेल .
अपयश आले की आपल्याला असे वाटू लागते की आपण खूप वेळ वाया घालवला आहे, अशा गोष्टीवर ज्यामधून आपल्याला काहीच प्राप्त झाले नाही. आणि आता आपल्याकडे वेळच उरला नाही, आणि मग या विचारामुळे आपली सारासार विचार करण्याची क्षमता आपण गमावून बसतो.
'शितावरून भाताची परीक्षा' असे म्हंटले जाते पण यश आणि अपयशाच्या बाबतीत ते लागू होत नाही. म्हणजे आपला एखादा निर्णय चुकला आणि त्यामुळे आपल्याला अपयश आले, तर प्रत्येक वेळी आपला निर्णय चुकेल असे नक्कीच होणार नाही. मात्र प्रयत्न न करण्याचा निर्णय नक्कीच चुकीचा ठरेल.
आपल्याला एकदा आलेल्या अपयशाने आपण खचून जातो आणि आपल्याला असे वाटू लागते की, आता सगळे संपले यापुढे आपण काहीच करू शकत नाही, आपल्या हातून काहीच होऊ शकत नाही. पण तो आपला खूप मोठा गैरसमज असतो, असा विचार करून पाऊल मागे घेण्यापेक्षा थोडी हिम्मत दाखवून अपयशाला सामोरे जा.
आयुष्यात जर अपयश आले नाही, तर आपल्याला अनुभव कसे मिळणार, आपण यशाचा आनंद कसा घेणार. अपयशानंतर येणाऱ्या यशाचा आनंदच वेगळा असतो, आणि कदाचित सगळ्यांनी तो एकदा तरी अनुभवायला हवा.
टिप्पण्या