लोक जे सल्ले देतात ते खरच आपल्या उपयोगी पडतात का?

जगात ही एकच अशी गोष्ट आहे जी, न मागता आणि फुकट मिळते. सल्ला देणाऱ्याला त्या बाबतीत अनुभव असो किंवा नसो, सल्ला देणं आपली जबाबदारी आहे असं समजून तो देत असतो. त्यात किती तथ्य आहे, त्याने समोरच्या व्यक्तीला मदत होईल की नाही या गोष्टीशी त्याला काही एक घेणं देणं नाही.

अशा परिस्थतीमध्ये आपण एकच काम करू शकतो, 'ऐकावे जनाचे करावे मनाचे'. सल्ला देणारी व्यक्ती कोणीही असो, पण तो सल्ला आपल्या आयुष्यात खरच उपयोगी पडणार आहे की नाही ते जाणून घ्या. 

खूप वेळा लोकांना बोलताना ऐकलं असेल, घर आणि गाडी असेल तर त्या माणसाकडे खूप पैसा आहे, तो खूप सुखी मनुष्य आहे. घर आणि गाडी आहे म्हणून तो माणूस सुखी असेल ही व्याख्या च चुकीची आहे. पैसा असणं आणि तो असेल तर घर आणि गाडी बघून एखाद्या माणसाची कुवत ठरवणं चुकीचं आहे, त्यामुळे हा सल्ला कधीच ऐकू नका. तुमची सुखी असण्याची व्याख्या नक्कीच इतरांपेक्षा वेगळी असू शकते.

समाजात राहायचे असेल तर, त्याप्रमाणेच वागलं पाहिजे. का? कशासाठी? कोणी सांगितलं आहे? ते सांगतील तसे वागायचे, आपल्या आयुष्यातले निर्णय समाजाला पटतील असेच घ्यायचे, मग ते आपल्या मनाविरुद्ध असेल तरी चालतील. आहेत कोण हे लोक जे आपल्या आयुष्याचा निर्णय घेतील, जो कोणी हा सल्ला देईल त्याला हा प्रश्न नक्की विचारा.

अनोळखी व्यक्तीशी बोलू नका. अनोळखी व्यक्तींशी बोललोच नाही, तर नवीन लोक भेटणार कसे? ओळखीचे कसे होणार? प्रत्येक व्यक्ती ओळखीची होण्याअगोदर अनोळखीच असते. आणि सध्याच्या काळात पावला पावलावर अनोळखी व्यक्तींशी बोलण्याची गरज भासते. एखाद्या नवीन व्यवसायासाठी, नवीन मित्र बनवण्यासाठी, अगदी लग्नासाठी देखिल. सुरुवातीला हे लोक आपल्यासाठी अनोळखीच असतात.

योग्य सल्ला मिळाला तर आपल्या आयुष्याला वेगळे वळण मिळते. मात्र तो सल्ला योग्य आहे की नाही हे ओळखणे गरजेचे आहे. असे खूप कमी लोक असतात जे आपल्या बाजूने विचार करून, आपली परिस्थिती समजून घेतात आणि मगच काहीतरी उपाय सुचवतात.

टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट