काही गोष्टींवर विश्वास ठेवणं आत्ताच थांबवा.
आपल्याला जर आयुष्यात पुढे जायचं असेल, यशस्वी व्हायचं असेल तर काही गोष्टींवर विश्वास ठेवणं आणि काही गोष्टींवर न ठेवणं आत्ताच सुरू करायला हवं. या दोन्हीही गोष्टी तितक्याच महत्वाच्या आहेत.
कोणी कितीही काहीही बोलत असेल तरी आपण स्वतःवरचा विश्वास कधीच डगमगु देता कामा नये. कारण आपल्याला जेवढं आपण स्वतः ओळखू शकतो तितकं कोणीच ओळखू शकत नाही. आपण कोणती गोष्ट किती उत्तमरित्या करू शकतो हे आपल्यापेक्षा जास्त चांगलं कोणीच ओळखू शकत नाही.
आत्मविश्वास ही एक अशी गोष्ट आहे जी, आयुष्याच्या प्रत्येक पायरीवर हळू हळू मिळत जाते. त्यामुळे एखाद्या कामाची सुरुवात करण्याअगोदर आपण असे बोलू शकत नाही की 'या कामासाठी अजून मी तयार नाही' किंवा 'मला अजून तेवढा आत्मविश्वास नाही'.
एखाद्या कामाची सुरुवात केल्यानंतरच त्याबद्दल तुम्हाला काही खाच खळगे कळतील, फायदे तोटे कळतील आणि मगच तुम्हाला त्या गोष्टीबद्दल आत्मविश्वास वाटेल, की तुम्ही हे करू शकता. त्यामुळे कितीही वाटलं की आपण या गोष्टीसाठी तयार नाही, तरीही ते करून बघा कारण जोपर्यंत तुम्ही ते करत नाही तोपर्यंत तुम्ही त्यासाठी कधीच तयार नसणार.
माणूस आहे मग चुका या घडणारच, त्या चुकांमधून आपल्याला काय शिकायला मिळते आणि त्याचा आपण भविष्यात कसा वापर करतो यावर सगळ्या गोष्टी अवलंबून असतात. त्यामुळे आपल्या हातून जर चूक झाली तर ती वाईट गोष्ट आहे किंवा आपण सारख्याच चुका करतो असं वाटून घेण्याच काहीच कारण नाही, तुमच्या हातून चुका घडतात कारण तुम्ही प्रयत्न करता.
आपल्यालाच काय, सगळ्यांनाच असे वाटत असते की समोरच्या व्यक्तीच्या आयुष्यात खूप चांगल्या गोष्टी घडत आहेत आणि आपणच एक असे आहोत की कितीही मेहनत केली तरी हाती काहीच लागत नाही.
मात्र तसे नसते, कदाचित त्या व्यक्तीने तितकी मेहनत घेतली असेल ती गोष्ट मिळवण्यासाठी, त्याच्या आयुष्यातला खूप सारा वेळ दिला असेल. आणि महत्वाचं म्हणजे आपल्याला वर वर जसं दिसतं, प्रत्येक गोष्ट तशी असतेच असं नाही त्यामुळे आपल्या आयुष्याची तुलना दुसऱ्या कोणाशी तरी करणं बंद करा.
टिप्पण्या