रोज वाचन महत्वाचे का आहे?
' वाचाल तर वाचाल ' हे वाक्य तर प्रत्येकाने ऐकले असेल, मग आता त्याचे थोडे फायदे किंव्हा त्याचे महत्त्व जाणून घेऊया. खूप गोष्टी अशा असतील ज्या माहीत असतील मात्र लक्षात आल्या नसतील. वाचून नक्कीच असं वाटेल तुम्हाला.
वाचन करत असताना, जसे की एखादी गोष्टीचे पुस्तक, त्यामधे असलेले लोक, जागेचे वर्णन, लोकांचे वर्णन हे जरी सगळ्यांसाठी सारखे असले तरी, त्याची कल्पना करण्याची पद्धत प्रत्येकाची वेगळी असते. त्यामुळे आपल्या कल्पनेतील जग आणि आणखी कोणत्याही दुसऱ्या व्यक्तीचे तेच कल्पनेतील जग पूर्णपणे वेगळे असेल.
वाचन केल्यामुळे कधी आणि काय फायदा होईल हे आपल्याला देखिल कळणार नाही, जसे एखादा परिच्छेद तुम्ही कुठे तरी वाचला आणि तुम्ही मुलाखतीसाठी गेला आहात आणि तिथे त्या संबधित प्रश्न विचारला तर तुमच्या जवळ त्या गोष्टी बद्दलचे ज्ञान असेल. किंव्हा एखाद्या लेखकाने एखादे पुस्तक वाचले आणि त्यामधे एखादे असे वाक्य असेल ज्याच्या मदतीने त्या लेखकाला एक नवीन कल्पना सूचेल.
आणखी एक महत्त्वाची गोष्ट जी वाचनामुळे मिळते ती म्हणजे, प्रेरणा. आपल्याला वाचनातून खूप जास्त प्रेरणा मिळते जसे की आत्मचरित्र. जे लोक खूप जास्त परिश्रम करून खूप पुढे गेले आहेत त्यांचा संघर्ष, त्यांनी केलेल्या अडचणींचा सामना हे वाचून आपल्याला ही आयुष्यात काहीतरी करून दाखवायची प्रेरणा मिळते, कुठेतरी विश्वास जागा होतो की आपण ही काहीतरी करू शकतो.
जर तुम्हाला स्वतःला अद्ययावत ठेवायचे असेल, स्वतः मधे सुधारणा करून घ्यायची असेल, जगाशी जुळवून घ्यायचं असेल तर, वाचन खूप जास्त महत्वाचे आहे जसे की वर्तमानपत्र. चालू जगाबद्दल माहिती जाणून घेण्यासाठी वर्तमानपत्रांचा सर्वात मोठा वाटा आहे.
जर वाचनाची सवय नसेल तर ती हळू हळू लागू शकते, जसे की आपण वाचनाचा समावेश दिनक्रमात समाविष्ट करून हे करू शकतो. जसे की आपल्याला रोज वाचनाची सवय नसेल, पण रोज चहा किंव्हा कॉफी प्यायची सवय असेल तर त्यासोबत पुस्तक वाचायला घेऊन वाचनाची सवय लावून घेऊ शकतो, प्रवासातील जो वेळ असतो त्या वेळेत आपण वाचनाची सवय लावून घेऊ शकतो.
सुरुवात अगदी लघुकथा आणि रहस्य कथा पासून केलेली उत्तम. वाचन महत्वाचे आहे, हे सवय लागल्यावर नक्की कळते.
टिप्पण्या