त्यालाही थोडसं समजून घेऊया!
प्रत्येकाला असं वाटत असतं की, आयुष्यात अशी एक तरी व्यक्ती असावी जी आपल्याला समजून घेईल. मग प्रत्येक व्यक्ती अशी अपेक्षा समोरच्या कडून करते आणि विसरून जाते की, आपण ज्या व्यक्ती कडून अपेक्षा करत आहोत त्या व्यक्तीला देखिल तसेच वाटू शकते.
स्त्री - पुरुष असा फरक करायचा झाला तर खूप मुद्दे आहेत, पण आपण आता त्याबद्दल बोलायचे नाहीये. आता मुद्दा असा आहे की, आपण खरच पुरुषांना समजून घेतो का? ते थोडे भावना व्यक्त करण्यामध्ये मागे असतात नेहमीच, म्हणून ते भावनाशून्य आहेत असा त्याचा अर्थ अगदीच नाही. गरज आहे ती त्यांच्या त्या भावनाशून्य चेहऱ्यामागची भावना समजून घेण्याची.
आपल्याला असं वाटतं फक्त स्त्रियांबद्दलच त्यांच्या आवडी निवडी नुसार त्यांच्याबद्दल मत बनवले जाते, पण असं नाहीये अगदी पुरुषांना देखिल त्यांच्या आवडत्या रंगावरून, रडण्यावरून बोललं जातं, जर त्यांना जेवण बनवायला आवडत असेल, घरातील काम करायला आवडत असेल तर लोक त्यांच्या पुरुषार्थावर प्रश्नचिन्ह उभं करतात आणि हे बोलणारे देखिल पुरुषच असतात.
समाजाच्या चौकटीत न बसणारे त्यांचेही काहीतरी नियम असतील, आवडी निवडी असतील, त्यांनाही त्यांचे मन मोकळे करायचे वेगळे मार्ग माहीत असतील जे उघड उघड त्यांना करता येत नाहीत. त्यांच्या बद्दलचे जे समज आहेत तेच खरे आहेत, असे आपण मानत आलो आहोत, आणि ते तसेच आहेत असे अजूनही मानतो.
' सगळे सारखेच असतात ' हे वाक्य आपण खूप वेळा ऐकलंय आणि कळत नकळत बोललो देखिल आहे. पण खरच एक स्त्री म्हणून आपल्या आयुष्यात असलेला किंव्हा येणारा प्रत्येक पुरुष सारखाच असतो का? हेच वाक्य आपण आपल्या बाबांबद्दल, भावाबद्दल बोलू शकतो का? नक्कीच नाही, हे लोक आपल्या आयुष्यातले सगळ्यात जवळचे असतात. मग तसच प्रत्येक जण वेगळा असतो, सगळेच चांगले किंव्हा सगळेच वाईट असं नसतं.
आपण विचार देखिल करू शकत नाही त्यांच्यावर किती जबाबदाऱ्या असतात, आपण विचार नाही करू शकत, का? कारण हे लोक कधी ते बोलुन दाखवत नाहीत, जाणवून देत नाहीत म्हणून.
त्याला जर आवडत असेल तर जेवण देखिल बनवू द्या, त्याला जर आवडत असेल तर गुलाबी रंग देखिल आवडू द्या. त्याच्या आवडत्या रंगावरून किंव्हा आवडी निवडू वरून ठरवू नका की तो पुरुष आहे की नाही, जर तो जबाबदारीने वागत असेल, जे पात्र आहेत त्यांना आदर देत असेल, रात्री अपरात्री त्याला पाहून एखाद्या स्त्री ला भीती वाटत नसेल, तर यावरून ठरवा की तो पुरुष आहे की नाही. त्यालाही थोड समजून घेऊया.
टिप्पण्या